एड.रमेश एस.उमरगे (अण्णा) समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानून केवळ आदर्श विचारच नव्हे तर त्या विचारावर प्रत्यक्ष चालणारं व प्रचंड सकारात्मक उर्जा लाभलेलं एक आदर्श व्यक्तीमत्त्वं!
एड.रमेश एस.उमरगे (अण्णा) समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानून केवळ आदर्श विचारच नव्हे तर त्या विचारावर प्रत्यक्ष चालणारं व प्रचंड सकारात्मक उर्जा लाभलेलं एक आदर्श व्यक्तीमत्त्वं!
"खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित. तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे".
या महान कवितेतील उक्तीप्रमाणे आपल्या जीवनाची नौका चालवणारं एक आदर्श व्यक्तीमत्त्वं म्हणजे 'एड.रमेश एस. उमरगे' (अण्णा). ही कविता आम्हाला आमच्या बालपणी शालेय जीवनात शिक्षकांनी शिकवली होती. तेव्हा कवितेचा अर्थ, मतितार्थ कळाला नाही. परंतु जसे जसे वय वाढत जाऊन माणसाच्या बौद्धिक क्षमतेत वृद्धी होते. तसे त्यांना लहानपणी त्याच्यावरील झालेल्या संस्काराचा, चांगल्या गोष्टीचा अर्थ कळू लागतो. हा अर्थ कळण्यासाठी माणसाच्या केवळ वयातच वृद्धी व्हावी लागते असे नाही तर त्याला जीवन जगत असताना बरे वाईट अनुभवही यावे लागतात. तेव्हा कुठे अशा कवितांचा खरा अर्थ असो किंवा एखाद्या महान संतांच्या उक्तींचा, कवनांचा, शास्त्रातील सिद्धांताचा, महापुरूषांच्या विचारांचा खरा अर्थ कळतो. त्यानंतरच मग प्रत्येक माणसांची जगाकडे पाहण्याची आपली दिशा व दृष्टी ठरते. दिशा ठरल्यानंतर काही माणसं केवळ नकारात्मकतेवर विचार करून, त्यावरच भर देऊन हे जग फार वाईट आहे म्हणून आत्मकेंद्रित होतात व केवळ आपला वैयक्तिक जीवनोत्कृष कसा साधता येईल याचाच विचार करतात व आपल्या महान जीवनाला मर्यादित करून टाकतात. तर काही माणसाच्या जीवनातही चांगले, वाईट अनुभव येतात. परंतु ही माणसं त्यातून काहीतरी शिकतात. जगात जे काही वाईट घडतेय ते केवळ लोकांच्या आज्ञानापोटी घडतेय म्हणून त्याकडे प्रगल्भतेने आपल्या मनाच्या नयनचक्षुने पाहतात व ती घडी बदलण्यासाठी,लोकांचे विचार व जीवनमान उंचावण्यासाठी, त्यात सर्वोतोपरी परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्या उदारअंतकरणाने महत्प्रयास करतात. ही दोन प्रकारची माणसे या जगात आहेत. पहिल्या प्रकारातील माणसांना सर्व प्रकारची भौतिक सुख मिळतात. परंतु शेवटी एखाद्या अस्तित्वहीन जीव-जंतु, किटकाप्रमाणे ती मरण पावतात. जसे काय या अवनीवरती त्याचं अस्तित्वच नव्हतं. अशाप्रकारे ते अदृश्य होतात आणि दुसऱ्या प्रकारातील माणसं आपल्या प्रगल्भतेने बरे-वाईट अनुभव घेऊन त्याच्या कारणांचा शोध घेतात, चिंतन- मनन करतात व त्यावर आपल्या चिंतनातून प्राप्त झालेल्या ज्ञानाने, अनुभवाने वाईट गोष्टीच्या अंधकारमय युगावर विजय मिळवतात. या सर्व गोष्टी करण्यामागे त्यांचा उद्देश हा लोककल्याण, जणकल्याण हाच असतो.
अशीच माणसे पुढे "मरावे परंतु किर्तीरुपी उरावे" या म्हणीला सार्थ ठरवितात व या समस्त ब्रम्हांडातील आपली जी पृथ्वी, अवनी, वसुंधरा आहे त्यावर आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा व त्याची अमिट छाप सोडून जातात. अशीही काही महान, त्यागी, ध्येयवादी, उदारअंतकरणी कर्मयोगी माणसे असतात. त्यापैकीच एक आदर्श असं व्यक्तीमत्त्वं म्हणजे आमचे एड.रमेश एस.उमरगे (अण्णा).
एड. रमेश एस.उमरगे (अण्णा) हे एक उच्चविद्याविभूषित, सुसंस्कारित, वैज्ञानिक, समतावादी, मानवतावादी शिस्तप्रिय, अत्यंत मनमिळावू, सर्वत्र नावलौकिक व अतिशय सकारात्मक उर्जा लाभलेलं व आपल्या सुसंवादाने सर्वांची मनं जिकणारं तसेच प्रत्येकांच्या मनात घर करणारं एक क्रियाशील व्यक्तीमत्त्वं!
एड.रमेश एस.उमरगे (अण्णा) यांचा परिचय सांगण्यासाठी मला आधी जी वैचारीक पार्श्वभूमी सांगावी लागली त्यावरून बहुतांश जणांच्या मनात हा लेख वाचत असताना असा विचार येऊ शकतो की एड.रमेश एस.उमरगे (अण्णा) हे एक अध्यात्मिक पुरुष आहेत. असा विचार येणे साहजिकच आहे आणि ते बरोबर सुद्धा आहे. उमरगे अण्णांनी सध्याला आपलं जीवन अध्यात्मासाठीच वाहून घेतलेलं आहे. परंतु 'उमरगे' अण्णांच्या या अध्यात्मिक जीवनाची सुरुवात आताच नाही तर अण्णाच्या तरुणपणातच झालेली आहे. आज अण्णाकडे जो एवढा मोठा लौकिक व दांडगा असा लोकसंग्रह, प्रचंड सामाजिक, धार्मिक अध्यात्मिक ज्ञान जीवनानुभव आहे. परंतु अण्णाकडे जेव्हा काहीच नव्हते तेव्हा त्यांनी याची सुरुवात केलीय. जवळपास ३८ वर्षापूर्वी महाराष्ट्रातील 'शिरूर अनंतपाळ' या अतिशय छोट्या खेडेगावातून येऊन राज्याच्या सांस्कृतिक राजधानी असलेल्या ऐतिहासिक पुणे या शहरात आपले नाव कमावले आहे. वर्षे १९७८ मध्ये श्री. उमरगे अण्णा हे महाराष्ट्राच्या पोलीस दलात पुणे येथे एक 'शिपाई' म्हणून रूजू झाले होते. आपले शासकीय कर्तव्य बजावत असतानाच त्यांनी आपल्या शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही.सदरील कर्तव्य बजावतच त्यांनी एल.एल.बी. ही कायद्याची पदवी मिळविली. या घटनेला आज ३२ वर्षे पुर्ण होत आहेत. तेथे आपल्या अंगी असलेल्या शिस्तीने व गोड वाणीने, आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांची मने जिंकली. पण तेवढ्यावरच समाधान मानणारे अण्णा कसले? तेथून तर अण्णांच्या जीवनाचा खरा प्रवास सुरु झाला.
तेथे आपल्या कामाने सर्वांवर एक अमिट अशी छाप सोडून अण्णांनी आपले मार्गक्रमण चालूच ठेवले. नंतर पुढे आपल्याठायी असलेल्या शैक्षणिक योग्यतेने, आपल्या आजवरच्या अनुभवाने, अंगभूत कौशल्याने पदोन्नतीने अण्णा ३५ वर्षात सी.आय.डी. तील अतिशय महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या 'इंटेलिजन्स ऑफिसर' या पदापर्यंत पोहचले. ही फार मोठी व अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. एवढ्या छोट्याशा खेड्यातून प्रखर ध्येयवाद उराशी बाळगून पुण्यासारख्या एवढ्या मोठ्या शहरात येऊन आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणे ही सहजसाध्य व गोष्ट सोपी नाही. पदरी काहीच नसताना स्वतःच्या जीवावर एक विश्व निर्माण करणे हे महत्प्रयासाने सुंदर अशा चारित्र्यवाण व्यक्तीलाच शक्य आहे.
अण्णांनी आपली पोलीस दलातील सेवा बजावत असताना पोलीस दलाचं " सदरक्षणाय खलनिग्रहणाय" हे जे ब्रीदवाक्य आहे. त्या ब्रीदवाक्याला आपल्या सेवेतून सार्थ ठरवून दाखविले. याची प्रचिती अण्णांसोबत प्रत्यक्ष संवाद साधल्यावर येते.याचं कारण म्हणजे उमरगे अण्णा यांच्यात असलेला अध्यात्मिकतेचा पैलू. त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील हा पैलू त्यांना भेटणाऱ्या व्यक्तीवर विशेष असा प्रभाव पाडून जातो. आज पोलीस खात्याकडे पाहण्याचा जनतेचा जो दृष्टिकोन आहे तो फार चांगला नाही. याला कारणही तसेच आहे. त्यातील काही लोकांच्या भ्रष्ट आचरणामूळे. ही एक नकारात्मक बाजू झाली. परंतु बुद्धीजीवी व बौद्धिक प्रामाणिकता ज्यांच्या ठायी आहे त्या व्यक्तीने जर नाण्याची नकारात्मक ही एकच बाजू बघीतली तर तो आपल्या बुद्धीचा व माणूसपणाचा अवमान होईल. म्हणून नाण्याची जी 'सकारात्मक' ही जी दुसरी बाजू आहे. त्याकडेही पाहावेच लागेल. सदरील खात्यात काही चांगली निस्वार्थ बुद्धीने काम करणारी माणसेही आहेतच. त्यापैकीच आमचे एड. रमेश एस.उमरगे अण्णा.
अण्णांनी आपल्या सेवाकार्यकाळात जनसेवा हेच ध्येय मानून कार्य केले. माणसाच्या ठायी निस्वार्थीपणे कार्य करण्याची इच्छा असली की हातून चांगलीच कार्य घडतात. काही लोकांचा जो विश्वास टिकून आहे तो अशा चांगल्या व्यक्तीमुळेच. ही मुलभूत अशी बाब आपण समजून घेतली पाहिजे. अण्णांनी कधीही आपली सेवा बजावत असताना आपण जनतेचे सेवक आहोत हे विसरले नाहीत. त्यांच्याकडे काम घेऊन येणाऱ्या जनतेच्या अडचणी ते अतिशय प्राधान्याने सोडवायचे. सर्वसामान्य जनतेपासून ते सर्व प्रकारची लोक त्यांच्याकडे यायची. त्या गोरगरीब पीडित लोकांना अण्णांनी कधीही आपण एक अधिकारी आहोत व माझा आपल्यावर वचक असला पाहिजे अशाप्रकारचं आचरण केले नाही. सर्वप्रकारची, सर्वस्तरांतुन लोक त्यांना भेटायला यायची व त्यांस अण्णाही एक माणूस म्हणून मदत करायचे. या गोष्टीची साक्ष आपल्याला अण्णांचं ' यह रंग है निराला" हे आत्मचरित्रं वाचून येते. त्यांचं सदरील आत्मचरित्रं प्रत्येकांनीच वाचावं असं आहे. त्यातून खूप काही आत्मसात करण्याजोगे चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील ही गोष्ट मी अगदी आत्मविश्वासाने सांगू शकतो.
सुशिक्षित, सुसंस्कारित, एक शिपाई, वकील, इंटेलिजन्स ऑफिसर, फॉरेनर ब्रँचचे व्हिसा अधिकारी, 'पॅनल न्यायाधीश' व एक अध्यात्मिक पुरूष. ही आहेत काही अण्णाच्या व्यक्तीमत्त्वांचे विविध पैलू. ही विविध पैलू अण्णांनी अत्यंत खडतर संघर्षातुन मिळवलीत याची ते साक्ष देतात. देव प्रत्येक माणसांचा जन्म हा एखाद्या विशिष्ट चांगल्या कामासाठी घालतो व ते काम त्याने केले पाहिजे, असं म्हणतात. हे काम करण्यासाठी काही लोक वेगवेगळी कारणे सांगून ती काम टाळतात.त्यापैकीच माझ्याकडे पुरेसा वेळ नाही म्हणून आपलाच विकास आपल्याच हाताने थांबवतात.अशीही बहुतांश लोक आहेत तर दुसरीकडे वेळ, आयुष्य, सुख-दु:खे, इच्छा, आकांक्षा या तितक्याच प्रमाणात असून काही लोकं आपला व आपल्यासोबतच सर्वांचा उत्कर्ष साधतात व आपल्या कार्याने अजरामर होऊन जातात. उमरगे अण्णांचं व्यक्तीमत्त्वही त्यापैकीच एक.
पोलीस दलात शिपाई होते तेव्हापासून ते सी.आय.डी.तील इंटेलिजन्स ऑफिसर. त्यानंतर आता पॅनल न्यायाधीश पर्यंतच्या त्यांच्या जीवनप्रवासात त्यांनी नेहमी जनसेवा हेच ध्येय मानून कार्य केलं.पॅनल न्यायाधीश म्हणून काम पाहताना त्यांनी अनेक प्रकारचे जनतेचे प्रलंबित खटले निकाली लावले आहेत. अण्णासारखी माणसें केवळ न्यायपालिकेतच नाही तर कोणत्याही क्षेत्रात गेली तर आपल्या कार्यांचा ठसा जनतेच्या मनावर उमटवतात.ते याच कारणांमुळे व त्यांच्यातील असलेल्या अध्यात्मिकतेमुळे. मी तर असं म्हणेन की अण्णाने जेवढं नाव, लौकिक, प्रतिष्ठा, विलक्षण असा लोकसंग्रह मिळवलेला आहे तो याच गुणामुळे. त्यांचा पिंड हा अध्यात्मिकतेचा आहे. ही बाब त्यांच्या जीवनसंघर्षातून प्रकर्षांने जाणवते. केवळ अध्यात्मामूळेच हातून अशी उदात्त सत्कार्य घडतात.
अध्यात्मामूळे त्यांच्या ठायी अहंकाराचा किंचीतही लवलेश नाही. "ज्याचा अभिमान गेला, तुका म्हणे तोची देव झाला". याप्रमाणे अण्णांचं मन अतिशय उदार व अहंकारविरहीत आहे. त्यांना आजवर केलेल्या देशसेवेचा, समाजकार्याचा, वेगवेगळी पद भुषविल्याचा, अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाल्याचा तसेच गरजू लोकांना मदत केल्याचा कसल्याच प्रकारचा गर्व नाही. अण्णांनी आजपर्यंतच्या त्यांच्या आयुष्यात संकटात नडलेल्यांना, परिस्थितीने गांजलेल्या गरजू लोकांना मदत केली आहे. त्यांचं आत्मचरित्र व त्यांच्यावर अनेक मान्यवरांनी केलेल्या प्रशंसापर प्रतिक्रियेचा अभ्यास केला असता असे जाणवते की अण्णांनी निस्वार्थीपणे अनेक गरजूंना मदत केलेली आहे. सामान्यतः आपण पाहतो की आजकाल कोणीही कुणाला मदत, सहकार्य करत नाही. याचं कारण लोक संकुचित व आत्मकेंद्रित झालेली आहेत. काही माणसं असेही आहेत की मदत करतात परंतु मनात कुठलातरी स्वार्थ ठेवून. ही सामान्य माणसांची लक्षणे आहेत. परंतु ज्या पुरूषात अध्यात्म आहे, ज्याचा पिंड हा अध्यात्माचा आहे. ती व्यक्ती कधीही कुठला मोह ठेऊन इतरांना मदत करत नाही. मोह, माया, लोभ, अहंकार, गर्व, अभिमान ही सर्व मनाचे रोग आहेत. ही रोग घालवण्यासाठी अध्यात्माएवढे रामबाण औषध अन्य कोणतेही नाही. नेमकी हीच गोष्ट अण्णांनी ओळखली व आपलं जीवन त्यासाठी वाहून घेतलं.
अण्णांनी अनेकांना आपापल्या परीने मदत केली आहे.मग ती मदत एखाद्या बहुमोल मार्गदर्शनाची असो की एखाद्याला संकटात साथ देणे, मानसिक आधार देणे असो की आर्थिक असो. जे काही केलं ते निस्सीम अशा निस्वार्थीबुद्धीने केलं. त्यांचं मन हे अत्यंत निर्मळ, अहंकारविरहीत पाण्याच्या वाहत्या झऱ्यासारखे आहे. याचीही प्रचिती त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या आत्मचरित्रावरून तसेच अनेक मान्यवरांनी दिलेल्या त्यांच्यावरील प्रतिक्रियेवरून येते.
अण्णांची आणि माझी तशी प्रत्यक्षपणे भेट झाली नाही. परंतु त्यांची आणि माझी जी ओळख झाली ती डॉ.बबन जोगदंड सर (संपादन अधिकारी,यशदा अकॅडमी पुणे) यांच्यामुळे. त्याबद्दल आदरणीय बबन जोगदंड सरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी मला त्यांच्यासारख्याच चांगल्या लौकिक लाभलेल्या एका आदर्श व्यक्तीमत्वाची ओळख करून दिली. नंतर अण्णाशी माझं अनेकवेळा फोनवर बोलणे झालं. पहिल्यांदा फोनवर बोलतानाच अण्णांनी अतिशय आत्मियतेने व प्रांजळ बोलण्यातूनच माझ्या मनात जागा केली. त्यांच्या बोलण्यामुळे मी अतिशय प्रभावित झालो व ते आपलेसे वाटायला लागले व दुसरी गोष्ट उमरगे अण्णा मला, जे भेटले ते त्यांच्या आत्मचरित्रातुन.
त्यांच्यातील विलक्षण अशी अध्यात्मिकता त्यांना मानवी मनाच्या उच्चपदाला घेऊन गेलेली आहे. अनेक मान्यवर व्यक्तींच्या प्रतिक्रिया वाचत असताना एक गोष्ट दिसून येते की त्यांच्या मनात अण्णाविषयी निस्सीम अशी श्रद्धा आहे. अण्णांने भुषवलेल्या पदापेक्षा त्यांच्या स्वभावाचं, त्यांच्या विचारांचं, त्यांच्या वाणीचं, त्यांच्यातील सकारात्मक व प्रसन्नतेचं जास्त कौतुक करतात. ही बाब मला फार प्रभावित करते. कारण समाजात चांगल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची काहीच कमी नाही.अगदी आय.ए.एस., आय.पी.एस, तहसीलदार, डॉक्टर, इंजिनिअर, न्यायाधीश लोक बहुसंख्येने आहेत. पण सार्वजनिक जीवनात वावरताना आपण पाहतो. या उच्चपदस्थ लोकांचं समाजाप्रती काहीच देणेघेणे नाही. अशी उच्चपदस्थ माणसे काय कामाची? समाजासाठी काही करणे तर दूरच पण ही समाजाला योग्य मार्गदर्शन सुद्धा करत नाहीत, व्यवस्थित बोलतही नाहीत. आजही सामान्य माणसाला अधिकारी लोकांची भीती वाटते. याचं कारण काय तर हा उच्चभ्रू अधिकारी सर्वसामान्य लोकांना व्यवस्थित बोलतही नाही. कुठेतरी आपली वचक आणि वर्चस्व असावं अशी या लोकांची मानसिकता असते.
म्हणून सामान्य लोक अशा अधिकारी लोकापासून चार हात दूरच राहतात. परंतु ही गोष्ट 'उमरगे' अण्णांच्या बाबतीत कधी झाली नाही. त्यांनी आजवर भुषवलेल्या पदापेक्षा त्यांच्या स्वभावाचं, विचाराचं, अध्यात्मिकतेचं कौतुक लोक खुल्या अंतकरणाने करतात. एक व्यक्ती म्हणून ही गोष्ट माझ्यावर फार प्रभाव टाकून जाते. पदाचं काय? कोणी छोटा तर कोणी मोठा असू शकतो. परंतु स्वभाव, चांगले विचार आणि त्या विचारावर प्रत्यक्षपणे चालणारे माणसं फारच कमी. 'उमरगे' अण्णा हे त्यासाठी अपवाद आहेत.
कारण त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक, धार्मिक संस्थेने त्यांना सन्मानित केलेलं आहे. त्यापैकी 'समाजभूषण' हा पुरस्कार असो की श्री. क्षेत्र देहू येथे मिळणारा संत तुकाराम महाराजांच्या नावाने मिळणारा 'जीवनगौरव पुरस्कार' असो. या गोष्टी नेमकी कशाची साक्ष देतात? तर या गोष्टी याची साक्ष देतात की अण्णांनी महापुरूषांच्या, संताच्या चांगल्या विचारांचा केवळ जयजयकारच केला नाही तर त्या विचारांचा आपल्या जीवनात अंगीकार केला आहे. ही गोष्ट फार मोठी आहे. बहुतांश लोकांचे विचार हे अतिशय चांगले असतात. परंतु त्या विचाराला अनुसरून त्यांंचं वर्तन नसतं. ही तुलनात्मक गोष्ट बऱ्याच जणांना उमजत नाही. म्हणून प्रत्यक्ष विचारांवर चालणारं उमरगे अण्णांचं व्यक्तीमत्त्वं आहे असं मी या लेखाच्या शिर्षकात म्हटलं आहे.
सामाजिकदृष्ट्याही विचार केला तर अण्णा हे सर्व जाती-धर्माचा आदर करतात. कूठल्याही जातीविषयी,
जाती बांधवाविषयी त्यांच्या मनात कटूता नाही. या गोष्टीची साक्ष त्यांचा सर्व जातीधर्मातील असलेला विलक्षण असा लोकसंग्रह व त्यांचं 'यह रंग है निराला' हे आत्मचरित्र वाचून पटते. भगवान बुद्ध, महात्मा बसवेश्वर, स्वामी विवेकानंद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विंचारांचा आणि कार्याचा विलक्षण असा प्रभाव त्यांच्यावर दिसून येतो. आपल्या देशाला पुन्हा एकदा 'जगाचा दीप' अर्थात महासत्ता असेल तर या महापुरूषांच्या विचाराशिवाय पर्याय नाही अशी अण्णांची विचारधारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा बसवेश्वर यांच्याविषयी अण्णा आपल्या आत्मचरित्रात लिहतात की, एकाने देशाला संविधान दिले तर दुसऱ्यांने मानवी मुल्यांचे संवर्धन केले. अशाप्रकारचं वैचारीक लेखन करून समाजाने महापुरूषांकडे केवळ पारंपरिक दृष्टिकोनातूनच न् पाहता अगदी डोळसपणे पाहावे ही नव्याने पाहण्याची दृष्टी दिली.माझ्या मते ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण अशा लिखाणाने दोन समाज जोडले जातात. ही गोष्ट सर्व लिंगायत बांधवांसह इतर सर्वांनी शिकण्यासारखी आहे. इतिहासाच्या वाचनातून अर्थ काढण्याची ही पद्धत विकसित झाली पाहिजे. जेणेकरुन दोन समाज एकत्र येतील.
उमरगे अण्णा' समाजसेवा व त्याबद्दल चिंतन करत असताना आपल्या आत्मोन्नतीचा विचारही करत असतात व आत्मोन्नतीतूनही समाजसेवा कशी करता येईल याचा ते विचार करतात. आपल्या स्वंयप्राप्त सिद्धसाधनेद्वारे अर्थात 'अलौकिक आत्मानंद अनुभूती क्रियेद्वारे' केवळ हस्तस्पर्शाने पुढील व्यक्तीच्या शरीरात या क्रियेचा संचार करतात.ते ही कुठल्याही विशेष अशा साधनाशिवाय. या क्रियेने मानवी शरीरातील नकारात्मक उर्जा व भाव नष्ट होऊन शरीरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. व्यक्तीचे शारीरिक व मानसिक दौर्बल्य दूर होते. व्यक्तीला दिव्य असा अनुभव यायला लागतो. ही क्रिया पुर्णतः वैज्ञानिक आहे. अशाप्रकारची दिव्य साधना उमरगे अण्णांनी प्राप्त केलेली आहे. आजच्या धावपळीच्या युगात माणसाला आपल्या आरोग्यासाठी वेळ देणे किंवा आरोग्य जपणे हे अतिशय महत्वाचे झालेले आहे. जीवनात आरोग्याशिवाय माणूस काहीच साध्य करू शकत नाही. म्हणून या क्रियेचा लाभ प्रत्येकांनी घ्यावा.असे मी आवाहन करतो.
तसेच मनुष्य हा केवळ आर्थिकदृष्ट्या सधन झाला म्हणजे तो सर्वोतोपरी सुखी होत नाही ही अण्णांची विचारधारा. परंतु ही विचारधारा देत असतानाच अण्णा परिश्रमालाही तितकेच महत्त्व देतात. परिश्रमातून मिळालेल्या धनाचा ते आदर करतात. माणसाने आपले जीवन हे परिश्रमातून अर्थातच नैतिकतेच्या मार्गाने आलेल्या धनातून जगले पाहिजे. ते अनैतिकतेच्या मार्गाने नको, असे ते म्हणतात. म्हणून ते इतरांच्या परिश्रमालाही महत्त्व देतात. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 'कायकवे कैलास' म्हणजे खरे परिश्रम हेच कैलास' असे मानून ते श्रमावर श्रद्धा ठेवून महात्मा बसवेश्वरांच्या मूळ शिकवणीचा अंगीकार करतात.
एवढेच नव्हे तर महात्मा बसवेश्वरांच्या वैज्ञानिकतेच्या विचारावर ते प्रत्यक्षपणे चालतात. बसवेश्वरांनी कधीही अंधश्रद्धेचा पुरस्कार केला नाही. मानवाचं 'देहच देवालय' आहे. ही महान संकल्पना बसवण्णांचीच.
इष्टलिंगाची साधना करा, स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे. तसेच आपसात सुसंवाद घडवून समाजातील प्रश्न सोडवा. स्त्रियांना समानतेची वागणूक द्या. त्यांच्यासोबत भेदभाव करू नका. जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद करू नका. ज्योतिष, भविष्य बघू नका. मांसाहार तसेच व्यसन करू नका. खोटे बोलू नका. नेहमी सदाचाराने वागा. बसवेश्वरांची ही उदात व महान शिकवण श्री. रमेश एस.उमरगे अण्णांनी आपल्या जीवनात अंगीकारली. याचा इतर लिंगायत बांधवांनी व सर्वांनी आदर्श घ्यायला हवा. कारण ही तत्वे वैश्विक व कालातीत आहेत. फार आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे की त्या काळात बसवेश्वरांची विचारसरणी एवढी प्रगल्भ कशी? यावर अनेक बुद्धीजीवी लोक आजही पी.एच.डी करून संशोधन करत आहेत.
'आंतरजातीय विवाह' घडवून आणणारा पहिला महापुरुष म्हणजे महात्मा बसवेश्वर. मागास जातीतील 'संत हरळय्या' यांचा मुलगा 'शिलवंत' व मधूररस ब्राह्मण मंत्र्याची मुलगी 'कलावती' या दोघांचा आंतरजातीय विवाह महात्मा बसवेश्वरांनी १२ व्या शतकात घडवून आणला. ही अतिशय क्रांतिकारी घटना आहे. आज आपण म्हणतो की वर्तमान समाज फार आधुनिक विचारसरणीचा झालेला आहे. परंतु आज महात्मा बसवेश्वरांच्या ९०० वर्षांनंतरही असा आंतरजातीय विवाह करण्याची व स्विकारण्याची आपली मानसिकता नाही. यावर समाजाने नव्याने विचार करण्याची अत्यंत गरज आहे. आपण आधुनिक झालोत म्हणजे नेमकं काय झालोत. याचा प्रत्येकांनी विचार करायला पाहिजे आणि विचारातून प्राप्त झालेल्या निष्कर्षाला आपण खरे उतरतो का याचाही प्रामाणिकपणे विचार व स्विकार करावा.
अशा अनेक उदात व वैश्विक शिकवणी बसवेश्वरांनी दिलेल्या आहेत. त्यांच्या याच शिकवणीमुळे महात्मा बसवेश्वर सातासमुद्रापार पोहचलेले आहेत. अगदी वैश्विक अशी विचारसरणी व शिकवण त्यांनी दिलेली आहे. त्या शिकवणीचे, त्या महान विचारधारेचे पाईक म्हणजे 'एड. रमेश एस.उमरगे अण्णा'. आपल्या जीवनकार्यातुन 'उमरगे' अण्णांनी दाखवून दिले आहे की दृढ निश्चय केला तर आजही आपल्याला धर्माचं पालन व त्यातील शिकवणीवर चालता येतं. आपल्या परिने होईल तशी समाजसेवा करता येते. अण्णाच्या या गोष्टी व एकूणच जीवनप्रवास अतिशय प्रेरणादायी असा आहे. त्यातून प्रत्येक व्यक्तीला घेण्यासारखे, शिकण्यासारखे खूप काही मिळेल. यावर माझा ठाम विश्वास आहे. म्हणून अण्णांच्या संपूर्ण जीवनकार्याला, त्यांच्या विचाराला, त्यागाला माझा मनापासून सलाम..नमस्कार.!
अँड.किरण टी.चावरे (नांदेड)
बी.एस.एल.,एल.एल.बी.,एल.एल.एम
मो.न.व व्हाट्सएप-9309770054
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा