जाणून घ्या! बदनामी (Defamation) किंवा बेअब्रू म्हणजे नेमकं काय? भारतीय दंड संहिता या कायद्यानुसार या गुन्ह्याची व्याख्या!
बदनामी किंवा अब्रूनुकसान म्हणजे नेमके काय?
आपण आज सर्वत्र पाहतो की,सध्याचे सामाजिक वातावरण फार बिघडत चाललं आहे. सामाजिक स्वास्थ्यासाठी ज्या काही अपायकारक गोष्टी आहेत त्या गोष्टीचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे. विविध सामाजिक मुल्य, आदर्श, धार्मिक, सामाजिक वातावरण यात फार मोठ्या प्रमाणात तफावत आलेली आहे. व्यक्तींच्या जगण्यात खूप मोठा बदल झालेला आज दिसून येत आहे. या सदरील बदलामुळे व्यक्ती व्यक्तीमध्ये दुरावा, गैरसमज, त्वेष,असुरक्षिततेची भावना फार मोठ्या प्रमाणात वाढतेय. यावर राग किंवा बदला घेण्याची जी वृत्ती आहे त्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणून काही लोक वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करताना दिसत आहेत. त्यापैकीच एक मार्ग म्हणजे खुनशी भावनेने वेगवेगळ्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीची बदनामी करणे हा एक प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढतोय. त्यात भर म्हणून सध्या सोशल मीडियावर बदनामी करण्याचं प्रमाणही फार वाढलेलं आहे. या सर्व बेकायदेशीर गोष्टीना भारतीय दंड संहितेचं कलम-४९९ मध्ये फार विस्तारितपणे सांगितलं आहे. अतिशय सटीक अशी व्याख्या या कलमामध्ये केलेली आहे.
" जो कोणी व्यक्ती बोललेल्या किंवा अशी शब्द जी एखाद्याकडून वाचले जावेत अशा बदनामीकारक शब्दांनी किंवा खुणांनी किंवा एखादे दृश्य किंवा एखादे असे निवेदन की ज्यामुळे त्या पुढील व्यक्तीस हानी पोहचेल, किंवा एखादा असा आरोप ज्यामुळे पुढील व्यक्तीच्या मानसन्मानाला इजा पोहचेल ही गोष्ट माहित असताना एखाद्या व्यक्तीची बदनामी करणे म्हणजेच "अब्रूनुकसान" होय.
ही व्याख्या समजून घेणे अतिशय गरजेचे आहे. कारण बदनामी होईल असं कोणतेही कृत्य या व्याख्येत बसणे फार महत्त्वाचे आहे. म्हणून व्याख्येला फार महत्त्व असते. आपल्या भारतीय कायद्यानुसार हा जो बदनामीचा गुन्हा आहे तो शाबीत होण्यासाठी काही मुलभूत घटक आहेत ती तीन प्रकारची आहेत.
१.म्हणजे एखादा व्यक्ती आहे त्याच्याशी संबंधित एखादा बदनामीकारक आरोप करणे किंवा तोच आरोप प्रसिद्ध करणे.
२. असा आरोप जो बोललेल्या किंवा लिखीत स्वरूपात किंवा खुणांनी किंवा एखादे दृश्य निवेदनाने केलेला आरोप.
३. तसेच असा आरोप ज्या आरोपामुळे आपल्याला हे माहिती आहे की आपल्या आरोपामुळे पुढील व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहचू शकते असा आरोप. ही तीन कारणे अत्यंत महत्त्वाची आहेत. याशिवाय बदनामीचा गुन्हा झाला असे म्हणता येणार नाही.
तसेच या गुन्ह्यात गुन्हा करणारी मुख्य व्यक्ती तसेच त्यास साथ देणारी व्यक्ती संयुक्तपणे जबाबदार असते.मग ती साथ किंवा सहकार्य कोणत्याही मार्गाने असो.ही एक महत्त्वाची बाब आहे.काहीजण विविध माध्यमांचा यासाठी आधार घेतात.जसे वर्तमानपत्रातून एखाद्या व्यक्तीची बदनामी करणे,त्यावर बदनामी होईल असे आरोप करणे.अशा गोष्टीचाही आधार घेतला जातो.काहीजण एखाद्या व्यक्ती विरुद्ध एखादा बदनामी कारक मजकूर लिहून तो बंद लिफाफा किंवा वैयक्तिक भेटून तो मजकूर देतात. तर अशा प्रकरणात तो बदनामीचा गुन्हा होत नाही. कारण बदनामी होण्यासाठी तो लिहलेला मजकुर आहे तो सार्वजनिक व्हायला हवा तरच त्याची बदनामी झाली असे मानण्यात येते अन्यथा नाही.
ही आहे या गुन्ह्याची थोडक्यात तोंडओळख.तसेच यात अनेक प्रकार आहेत. त्यास वेगवेगळ्या शिक्षा आहेत. तसेच काही महत्त्वाचे अपवादही आहेत.जे आपण पुढील लेखात सविस्तरपणे पाहू.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. मो.9309770054
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा